सरकारी कंपनीकडून हिस्सेदारी विक्री, 4422 कोटी उभारण्याचं टार्गेट, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची रांग
भारत सरकारची मालकी असणाऱ्या कंपनीने काही टक्के हिस्सेदारी विक्री करण्याच्या ऑफरला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशी 2.3 पट अधिक मागणी आली आहे.
नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ( BHEL ) मध्ये सरकारची पाच टक्के हिस्सेदारी विकण्याच्या ऑफरला (OFS) पहिल्या दिवशी कमालीचा प्रतिसाद मिळाला. संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 5,650 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोली लावली.
2.3 पट अधिक मागणी
गुंतवणूक आणि लोक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव अरुणीश चावला यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती दिली की, सरकारने या विक्री ऑफरमध्ये ग्रीन शू पर्यायाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दिवशी या ऑफरला 2.3 पटीने अधिक मागणी आली. किरकोळ गुंतवणूकदारांना गुरुवारी बोली लावण्याची संधी मिळेल.
4,422 कोटी उभारणाचं लक्ष्य
सरकार बीएचईएलमधील आपली पाच टक्के हिस्सेदारी विकून 254 रुपये प्रति शेअर या किमान मूल्यावर 4,422 कोटी रुपये उभारणार आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 256.07 रुपये प्रति शेअर या अंदाजित मूल्यावर 22.07 कोटींहून अधिक शेअर्ससाठी बोली लावली, तर ऑफरमध्ये 9.40 कोटींहून अधिक शेअर्स उपलब्ध होते. निर्गमच्या मूळ आकारात BHEL चे 10.44 कोटींहून अधिक शेअर्स किंवा तीन टक्के हिस्सेदारी समाविष्ट आहे. ‘ग्रीनशू’ पर्यायाअंतर्गत 6.96 कोटींहून अधिक शेअर्स किंवा दोन टक्के हिस्सेदारी विकली जाऊ शकते. एकूण 17.41 कोटी शेअर्स किंवा पाच टक्के हिस्सेदारी व्रिकी होणार आहे. बीएचईएलमध्ये सरकारची सध्याची हिस्सेदारी 63.17 टक्के आहे.
शेअर्सची कामगिरी
बुधवारी शेअर बाजारात बीएचईएलचा शेअर 258.60 रुपयांपर्यंत खाली आला होता. दिवसाअखेरीस शेअर 260.65 रुपयांवर बंद झाला, जो मागील बंद भावापेक्षा 5.58 कमी आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये आतापर्यंत सरकारने सार्वजनिक उपक्रम (PSU) च्या निर्गुंतवणूकीतून 8,768 कोटी रुपये जमा केले आहेत.
BHEL
भारत सरकारकडून 1964 मध्ये BHEL ची स्थापना करण्यात आली. BHEL भारतातील सर्वात मोठ्या अभियांत्रिकी व उत्पादन कंपन्यांपैकी एक आहे. वीज निर्मिती आणि औद्योगिक उपकरणांची निर्मिती कंपनीकडून करण्यात येते. वीज प्रकल्प, हायड्रो पॉवर उपकरणे आदी कामकाजाची क्षेत्रे आहेत.
