बांगलादेशात ‘दुसऱ्या’ मतानं सगळं चित्र पालटलं; जनादेशानं पॉवर गेम बदलला, PMची ताकद घटणार
बांगलादेशात काल सार्वत्रिक मतदान झालं. त्याचा निकाल आज जाहीर झाला. बांगलादेशातील प्रत्येक मतदारानं दोनदा मतदान हक्क बजावला.
ढाका: बांगलादेशातील निवडणूक निकालानं देशातील राजकारणात आमूलाग्र बदल होणार आहेत. बांगलादेशाला केवळ नवा नेता मिळालेला नाही, तर तिथल्या जनादेशामुळे संसदीय राजकारण बदलणार आहे. बांगलादेशात आता राज्यसभा अस्तित्त्वात येईल. पंतप्रधानांचे अधिकार कमी होतील. राष्ट्रपतींचं सामर्थ्य वाढेल. खासदारांना महत्त्वाच्या मुद्द्यांवर पक्षादेशाच्या विरोधात जाऊनही मतदान करता येईल.
बांगलादेशातील प्रत्येक नागरिकानं दोनदा मतदान केलं होतं. पहिलं मत नवं सरकार निवडण्यासाठी, तर दुसरं जनमताचा कौल जाणून घेण्यासाठी होतं. दुसऱ्या मताचा थेट संबंध बांगलादेशातील घटना बदलाशी होता. याला जुलै चार्टर असंही म्हटलं जातं. संविधानात बदल हवा की नको, यासाठी नागरिकांनी दुसरं मत दिलं. यासाठी हो किंवा नाही, यातील पर्याय निवडायचे होते. बहुतांश मतदारांनी होय हा पर्याय निवडला. याचा अर्थ बांगलादेशातील जनतेला संविधानात बदल हवा आहे.
